Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा
Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
Mumbai Local Train : तिथं गणेशोत्सवादरम्यान बेस्ट आणि मेट्रो सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असतानाच दुसरीकडे रेल्वे प्रवाशांसाठी मात्र काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, ऐन गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये म्हणजेच रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, यावेळी मध्य रेल्वे नव्हे, तर पश्चिम रेल्वेवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. (Mumbai News)
पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव - कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सध्या सुरू असून, या कामासाठी (Ganeshotsav 2024) गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला रात्री 12 वाजल्यापासून 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हा 10 तासांचा मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रवाशांनीसुद्धा याच अनुषंगानं प्रवासाची आखणी करावी.
गणेशोत्सवाचा पहिला आणि दुसरा दिवस, आठवडी सुट्टी यानिमित्तानं अनेक मुंबईकर रेल्वे मार्गानं प्रवास करत घराबाहेर पडतात. त्यात गणेशोत्सवही असला तरीही यंदा मात्र याच दिवसांणध्ये प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
कसं असेल ब्लॉकचं स्वरुप?
पश्चिम रेल्वे मार्गावर घेतल्या जाणाऱ्या या ब्लॉकमुळे सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली – गोरेगावदरम्यान अप जलद मार्गावर धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरीहून डाऊन जलद मार्गावर धावणार असून या लोकल गोरेगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वर जातील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!
गोरेगाव – बोरिवली दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल पाचव्या मार्गावरील धावतील. या लोकल फलाट उपलब्ध नसल्या कारणानं राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकावर थांबणार नाहीत याचीही प्रवाशांनी नोंद घ्यावी. याशिवाय, चर्चगेट-बोरिवली मार्गावरील काही धीम्या लोकल सेवा गोरेगाव स्थानकावर निर्धारित वेळेपेक्षा कमीत कमी वेळासाठी थांबतील आणि पुढे चर्चगेट रोखानं प्रवास करतील.
ब्लॉकमुळं लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहेत. मेगाब्लॉक कालावधीत अप आणि डाउन मेल/एक्स्प्रेसला 10 ते 20 मिनिटांचा उशीर अपेक्षित असून, काही लोकल अंशत: रद्दही केल्या जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली.