मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. राणे यांच्या 'झंझावात' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा येथे पार पडला. यावेळी गडकरी यांनी राणेंचा जीवनपट सर्वांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करत स्तुतिसुमने उधळली. राणेंनी त्यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते, असे गडकरी यावेळी म्हणाले.


'राणेंनी  चिठ्ठी टाकून निर्णय का घेतला?'


मी, राणे ‘स्टेट फॉरवर्ड’ आहोत!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणेंचा स्वभाव आणि माझा स्वभाव जवळपास सारखाच आहे. राणे आणि मी दोघेही ‘स्टेट फॉरवर्ड’ आहोत. दोघांच्याही मनात कोणताही कपटीपणा नसतो, असे सांगतानाच राजकारणात पद नसेल तर मैत्री कमी होते. पण राणे आणि माझी मैत्री कायम राहिली आहे. गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे हे दोन माझे नेते आहेत. मला राजकारणात मोठ-मोठी पदे मिळाली असतील पण माझे दोन नेते आहेत, ते म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे. या दोघांना विसरून कधीही चालणार नाही, असेही गडकरी म्हणाले.


राणे यांच्या डोळ्यात अश्रू आले


राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली. शिवसेना सोडू नका, असे मी राणे यांना समजावले होते. त्यावेळी राणे यांच्या डोळ्यांतही अश्रू आले होते, तसेच मी हा निर्णय आनंदाने घेत नसल्याचे त्यांनी मला सांगितले, याचीही आठवण गडकरी यांनी पुस्तक प्रकाशनाच्यावेळी करून दिली. राणेंकडे चांगले व्यवस्थापन कौशल्य होते. ते कधी परिस्थितीसमोर हतबल झाले नाहीत. महाराष्ट्र आणि मराठी माणसावर राणेंनी भरपूर प्रेम केले. तसेच राणेंच्या या पुस्तकात त्यांचा फक्त २५ टक्के इतिहास दिलेला आहे, असे गडकरी म्हणालेत.



राणेंच्या कर्तृत्वाला नक्की संधी मिळेल?


तुम्ही जीवनात असेच संघर्ष करत पुढे जात रहा. मराठी माणूस म्हणून आणि तुमच्या जवळचा राजकारणापलीकडचा एक मित्र म्हणून मी तुमचा हात पकडलाय. तुम्ही माझा पकडलाय. तुम्ही कोणत्याही पक्षात जा अन् कोठेही रहा. तुमचे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. ते तसेच राहतील. आणि कधी ना कधी महाराष्ट्रात राणेंच्या कर्तृत्वाला नक्की संधी मिळेल, असे गडकरी म्हणाले.