कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईला कोरोनाच्या संकटानं नाकीनाऊ आणलेले असतानाच आता आणखी एका साथीनं शहरात डोकं वर काढलं आहे. ही साथ म्हणजे मलेरियाची. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाचे रूग्ण अधिक असून मलेरियाचा धोका वाढण्यासही कारणीभूत ठरलंय ते म्हणजे कोरोनाचं संकट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळा सुरू झाला की मुंबईत मलेरियाचे रूग्णही वाढतात. पण, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत मलेरियाचे दुप्पटीहून अधिक रूग्ण वाढले आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात मलेरियाचे ४३८ रूग्ण होते, तर यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे ९५४ रूग्ण मिळाले आहेत. तसंच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मलेरियाचे २१६ रूग्ण मिळाले आहेत. दिलासादायक म्हणजे यंदा डेंग्यू, लेप्टो आणि गॅस्ट्रोच्या रूग्णांची संख्या मात्र कमी आहे. मलेरियाचे रूग्ण वाढण्यास कोरोना कारणीभूत ठरत आहे. 


पावसाळ्यात मुंबईमध्ये मलेरियाची साथ पसरू नये म्हणून दरवर्षी महापालिकेचा आरोग्य विभाग तसंच किटकनाशक विभाग एप्रिल महिन्यातच कामाला लागतो. पण, यंदा कोरोना संकटामध्ये सर्व स्टाफ गुंतल्यामुळं तसंच अनेकजणांना कोरोनाची लागणही झाली असल्यामुळं मलेरिया नियंत्रण उपाययोजनांकडं दुर्लक्ष झालं. मलेरिया पसरण्यास कारणीभूत असलेल्या एनाफिलिस डासाची उत्पतीस्थाने शोधून ती नष्ट करण्याचे काम तितकसं वेगानं झालं नाही. तसंच बराचसा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असल्यानही मर्यादा पडल्या. 


कुठं होते मलेरियाच्या डासांची उत्पत्ती? 


मलेरिया फैलावणा-या ऍनॉफिलीस डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होते. पाण्याच्या टाक्या, कारंजे, पाण्याचे हौद, पिंप, ड्रम, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी , टायर्स, नारळाच्या करवंट्या,थर्माकोल, पत्रे,पन्हाळे,घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते या स्वच्छ पाण्यात डास अंडी घालतात. 


 


ही एकंदर पार्श्वभूमी पाहता, मुंबईत १५ जुलैनंतर मलेरियाचे रूग्ण अधिक संख्येने वाढत आहेत. त्यामुळं मुंबईकरांनी आता कोरोनाबरोबरच मलेरियापासूनही सावध रहायला हवं.