`जश्न ए दिवाळी` काढा आणि `जय श्रीराम` लिहा, मनसे कार्यकर्त्यांचा फिनिक्स मॉलला दणका
Mumbai Phonix Mall Diwali Hashtag: दिवाळीच्या शुभेच्छा मराठीऐवजी उर्दू भाषेत देणे मुंबईतील फिनिक्स मॉलला महागात पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उर्दू भाषेतील शुभेच्छांचा फलक काढायला लावला आहे.
Mumbai Phonix Mall Diwali Hashtag: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे कार्यकर्ते मुंबईसह महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरण्यासाठी पुढाकार घेत असतात. असाच एक प्रकार कुर्ला येथे फिनिक्स मॉलमध्ये मनसैनिंकाच्या निदर्शनास आला. दिवाळीच्या शुभेच्छा मराठीऐवजी उर्दू भाषेत दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी फिनिक्स मॉल प्रशासनाला धारेवर धरले आहे.
दिवाळीनिमित्त कुर्ला इथल्या फिनिक्स मॉल बाहेर जश्न ए दिवाळी अशा पद्धतीचा हॅशटेक फिनिक्स मॉल कडून बनवण्यात आला होता. याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्षेप घेण्यात आला मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुषाली यांनी याबाबत मॉल व्यवस्थापनासमोर प्रश्न उपस्थित केला आणि त्यांना हा हॅशटॅग काढण्यास सांगितले.
कुठलीही गरज नसताना उर्दू मधून अशा पद्धतीने शुभेच्छा का देण्यात आल्या ? शुभ दीपावली, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी दिवाली हे आम्ही समजू शकतो मात्र 'जश्न ए दिवाली' हा काय नवीन प्रकार हे असे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा मनसे कडून देण्यात आला.
हिंदु सणांना मस्करीत घेण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप ठेवण्यात आला. दिवाळीच्या शुभेच्या, हॅप्पी दिवाली ठिक आहे पण 'जश्न ए दिवाली' हा प्रकार काय आहे? असा प्रश्न मनसैनिकांनी विचारला. दिवाळी हा शब्द पायथ्याशी ठेवलाय, असा आरोपही मनसेने केला. जश्न ए दिवाळी काढा आणि जय श्रीराम लिहा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यानंतर जश्न ए दिवाली यातील जश्न ए हा शब्द काढून टाकण्यात आला. तसेच मराठीवरील अन्याय खपवून घेऊ नका, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. वाद निर्माण करण्यासाठी असे प्रकार केले जात असल्याचा आरोप यावेळी मनसेकडून करण्यात आला.