गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई: आपण अनेकदा गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेल्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे चुकते करतो. काहीजण पेट्रोल पंपावर असणाऱ्या एटीएम मशिनमधून पैसे काढून देतात. एकूणच सर्वजण आता या प्रक्रियेला सरावले आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी नुकत्याच उघडकीस आणलेल्या एका प्रकारामुळे आता पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप करताना तुम्ही नक्कीच विचार कराल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पेट्रोल पंपावर वापरण्यात येणाऱ्या कार्डसच्या माध्यमातून पैसे लुटणाऱ्या टोळीला नुकत्याच बेड्या ठोकल्या. यावेळी चौकशीदरम्यान या टोळक्याची कार्यपद्धती समोर आली. त्यानुसार पेट्रोल पंपावर आपण जेव्हा डेबिट कार्ड स्वाईप करतो किंवा एटीएम मशिनमधून पैसे काढतो, तेव्हा या आपल्या कार्डचे क्लोनिंग केले जाते. या माध्यमातून  टोळक्याने आतापर्यंत लाखो रुपयांची लूट केली आहे. 


पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली. त्यापैकी दोघेजण पेट्रोल पंपावरून ग्राहकांचा डेटा चोरत असत. हा डेटा अन्य दोघांकडे सोपवल्यानंतर ते डुप्लिकेट एटीएम कार्ड तयार करून त्यामधून पैसे काढत. अशाप्रकारे या टोळक्याने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली होती. या आरोपींकडून एटीएम कार्डसाठी वापरण्यात येणारे मॅग्नेटिक कार्ड रीडर, सिम कार्ड, एटीएम कार्ड, इंटरनेटचा डोंगल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे भविष्यात पेट्रोल पंपावर कार्ड स्वाईप करताना ही बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे.