मेघा कुचिक, झी मीडिया, मंबई : दुबईहून तीन दहशतवादी (Terrorist) मुंबई (Mumbai News) शिरल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची माहिती देणारा फोन मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षात आल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दुबईहून शुक्रवारी तीन दहशतवादी आल्याची माहिती या फोनवर देण्यात आली आहे. या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. यापैकी एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर, गाडीचा नंबरही फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिला आहे. दरम्यान, राजेश ठोंगे असे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याआधीही राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला एका अज्ञात व्यक्तीने तालिबानचा सदस्य मुंबईवर हल्ला करणार असल्याची धमकी दिली होती. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने मुंबई पोलिसांना या घडामोडींची माहिती दिली, त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांना अलर्टवर ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, धमकी देणारा मेल पाठवणाऱ्याने स्वत:ची ओळख तालिबानी म्हणून केली. मुंबईत दहशतवादी हल्ला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. धमकीचा मेल मिळाल्यानंतर सत्य शोधण्यासाठी एनआयएने मुंबई पोलिसांसोबत संयुक्त तपास सुरू केला होता.


गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही असाच एक फोन पोलिसांना आला होता, ज्यामध्ये शहरातील अनेक भागात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मुंबईतील अंधेरी येथील इन्फिनिटी मॉल, पीव्हीआर मॉल जुहू, सहारा हॉटेल विमानतळ येथे बॉम्ब ठेवल्याची माहिती कॉलरने दिली होती. त्यानंतर शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.