आताची मोठी बातमी! ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या विराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली
येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार होते.
Thackeray Group : एक जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत केली. . या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण आता या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एक वर्ष होऊन गेलं, महापालिका विसर्जित झाली आहे. पावसाप्रमाणे निवडणूकाही लांबत चालल्या आहेत. निवडणुका घेण्याची हिम्मत आताच्या बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. सध्या वारेमाप उधळपट्टी सुरु आहे. रस्त्याच्या नावाने असेल, जी 20 च्या नावाने असेल, मुंबईला कोणीही मायबाप राहिलेला नाही. सर्व लुटालूट सुरु आहे. महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या एक जुलैला शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोर्चाला परवानगी नाकारली. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.
उद्धव ठाकरेंचा आरोप
उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आताच्या कारभारावर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिका एकेकाळी साडेसहाशे कोटीत होती. शिवसेनेकडे कार्यभार आल्यानंतर ही ठेवी जवळपास 92 हजार कोटीपर्यंत पोहोचली. या ठेवींमधून कोस्टर रोड, जनतेच्या उपयोगाची कामं महापालिका पार पाडत होती. आता मात्र कोणत्याही कामांसाठी महापालिकेच्या पैशांचा वापर सुरु आहे. आतापर्यंत 9 हजार कोटी या एफडीमधून वापरण्यात आल्याचंही आपल्या कानावर आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. हा जनतेचा पैसा आहे, याचा हिशोब त्यांना जनतेला द्यावाच लागेल, याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ठाकरे गटाने विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. ठाकरे गटाची वांद्रेतील शाखा अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेनं त्याच्यावर तोडक कारवाई केली. वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीनं बांधकाम करण्यात आलं होतं. ते बांधकाम मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं. कुठलीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून त्याठिकाणी बोर्ड लावण्यात आले होते. शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यावर मुंबई महापालिकेनं कारवाई केली.
ठाकरे गटाची सुरक्षा काढली
त्याआधी ठाकरे कुटुंबियांच्या (Thackeray Family Security) सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली. इतकंच नाहीतर मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट व्हॅन कमी करण्यात आलीय. तसंच पायलटही कमी केलाय. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली.
निकटवर्तीयांवर ईडीचे छापे
दुसरीकडे, कोव्हिड सेंटर कथित घोटाळाप्रकरणीही ठाकरे गटाची कोंडी करण्यात आली आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाणांच्या घरावरही ईडीने धाड टाकली. तर अधिकारी संजीव जैस्वाल, नितीन गुरव, राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, संजय शाह यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. कोव्हिड सेंटर बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचा आरोप यांच्यावर आहे. या संबंधित कंपन्यांकडून फायदा मिळवल्याचा आरोप असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.