हेल्मेट घातलेला हल्क पाहिलात का? मुंबई पोलिसांचे भन्नाट प्रमोशन
आतापर्यंत मुंबई पोलिसांनी अनेक भन्नाट क्लृप्त्या वापरल्याचे आपण पाहिले असेल.
मुंबई: अलीकडच्या काळात सोशल मीडियाचे प्रस्थ आणि वापर वाढल्यापासून अनेक शासकीय यंत्रणांनी ट्विटरसारख्या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करायला सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडलही त्यापैकीच एक म्हटले पाहिजे. नागरिकांना नियमांची माहिती देण्यासाठी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी अनेक भन्नाट क्लृप्त्या वापरल्याचे आपण पाहिले असेल.
यावेळीही मुंबई पोलिसांनी हेल्मेटचे महत्त्व पटवून देताना हल्क या सुपरहिरोचा प्रतिकात्मकरित्या वापर केला आहे. यामध्ये डोक्यावर शिरस्त्राण आणि अंगावर चिलखत घातलेला हल्क दिसत आहे. त्याखाली 'तुम्ही कितीही ताकदवान असाल, पण हेल्मेट घालायला कधीच विसरु नका', अशी कॅचलाईन लिहली आहे.
साहजिकच या ट्विटवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही नेटकऱ्यांनी पोलीस अधिकारीच कशाप्रकारे हेल्मेट न परिधान करता दुचाकी चालवतात, याचे फोटो ट्विट करुन पोलिसांनाही नियमांची आठवण करुन दिली आहे.