Baba Siddique Murder: आरोपींनी YouTube पाहून केला शुटिंगचा सराव, 25 दिवस आधीच घऱाबाहेर...; मुंबई पोलिसांचे खुलासे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौघांना अटक केली असून, तिघे फरार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौघांना अटक केली असून, तिघे फरार आहेत. पोलिसांनी इतर आरोपींना अटक करण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी युट्यूबवरील व्हिडीओंच्या माध्यमातून शुटिंगचा सराव केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत असून त्यांना काळ्या रंगाची एक बॅग सापडली आहे ज्यात एक बंदुक होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे की, "आरोपींना बाबा सिद्दिकींना ओळखण्यासाठी त्यांचा फोटो दिला होता. हल्लेखोरांनी घटनेच्या 25 दिवस आधी त्यांच्या घर आणि कार्यालयाची रेकी केली होती. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी युट्यूबवरुन गोळीबार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. मुंबईतच विना मॅगझिन ते सराव करत होते".
दरम्यान गुन्हे शाखेने चौथ्या संशयिताला अटक केली आहे. हरिशकुमार बालकराम असं या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याला उत्तर प्रदेशातील बहराइच येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येसाठी आर्थिक मदत आणि रसद पुरवल्याचा आरोप आहे. बलकराम हा पुण्यात भंगार विक्रेता म्हणून काम करत होता आणि तो हत्येमधील कटाचा भाग होता, असं पोलिसांनी सांगितलं. तीन आरोपींपैकी दोघे धर्मराज आणि शिवप्रसाद गौतम हे बाळकरामच्या भंगार दुकानात काम करायचे.
बाबा सिद्दीकी (66) यांची मुंबईतील निर्मल नगर परिसरात त्यांचा आमदार मुलगा झीशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या केली. त्यांना लीलावती रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. “मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट पुण्यात आखण्यात आला होता. मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत जे घटनेच्या वेळी उपस्थित होते,” असं पोलिसांनी सांगितलं.
हल्लेखोरांनी बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. लॉरेन्स बिष्णोई हा या टोळीचा म्होरक्या आहे, जो सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळे बिष्णोई टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तुरुंगात असतानाही इतक्या मोठ्या व्यक्तीची हत्या करण्याचा कट त्यांनी आखल्याने चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.