मुंबई : मुंबईत सकाळी १० ते २ ते दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला आहे. नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी काही तास वीज खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय.


यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. यानुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असल्याने उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असेही पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.



त्यामुळे मुंबई पालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.


ग्रीड फेल झाल्यामुळं वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य मुंबई शहरासह पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईतही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी मागील काही वेळापासून वेग पकडलेलं हे शहर पुन्हा एकदा थांबलं. 


अति उच्चदाब वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा बंद झाल्याने मुंबई उपनगरांमध्ये मुलुंड , भांडुप, नाहूर , कांजुर , विक्रोळी , आणि घाटकोपरच्या काही भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईच्या रस्त्यावरील सिग्नल बंद झाले आहेत. शिवाय मुंबईच्या वाहतुकीवर नजर असणारी सीसीटीव्ही यंत्रणा ही बंद झाली होती.


महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे.