प्रविण दाभोळकर, मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून 'मुंबईची लाईफलाईन' ठप्प होते. पण अजूनही आपण या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाही. दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूस प्लास्टिकच्या कचऱ्याचा डोंगर उभा राहत आहे. याकडे रेल्वे प्रशासन, पालिका, स्थानिक रहिवासी या सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.  धर्मेश बिरई हा तरुण गेले वर्षभर या समस्येसाठी लढा देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रेल्वे ट्रॅकच्या शेजारी राहणारे स्थानिक आपला कचरा ट्रॅकवर फेकतात, रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी रॅपर्स, प्लास्टिकच्या बॉटल्स सर्रासपणे ट्रॅकवर टाकताना दिसतात. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू असून ट्रॅकच्या दोन्ही बाजूस या प्लास्टिकचा डोंगर झालेला आपल्याला दिसून येतो. प्रत्येकजण यातून आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे. धर्मेश बिरई या निसर्गप्रेमी तरुणाने वर्षभरापासून या गंभीर समस्येविरूद्ध लढा सुरू केला आहे. त्याने रेल्वे प्रशासन, पालिका यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत. वेळोवेळी तो त्याचा पाठपुरावा करत असतो पण त्याच्या पदरीही निराशाच येत असल्याचे दिसत आहे. 


ही समस्या सोडवायची असेल तर प्रशासनाने पालिका कर्माचारी, स्वयंसेवी संस्था, निसर्गप्रेमी, स्थानिकांना एकत्र घेऊन यासाठी काम करण्याची गरज असल्याचे धर्मेश बिरई याने 24taas.com ला सांगितले. दर रविवारी रेल्वे ट्रॅक दुरूस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येण्यात येतो.  रेल्वे ट्रॅक, स्थानके यांच्या स्वच्छतेसाठीही 'स्वच्छतेचा मेगा ब्लॉक' घ्यायला हवा अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.