मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra)  कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा (covid-19) आकडा वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्र तसेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण क्षेत्रातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वे प्रवासाला (Mumbai Local) राज्य शासनाने परवानगी दिली आहे. RBI बँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका, वित्तीय सेवा किंवा अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. मात्र, त्यांना खासगी वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येईल. रिक्षा-टॅक्सीतून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कायम आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या  24 तासांत राज्यात 67013 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 568 रुग्णांचा मृत्यू झाला तर 62298 लोक बरे झाले. यानंतर राज्यात कोरोनाची लागण होणारी संख्या 40 लाख 94 हजार 840 पर्यंत वाढली असून त्यापैकी 33 लाख 30 हजार 747 रूग्ण बरे झाले असून 6 लाख 99 हजार 858 सक्रीय रुग्ण आहेत.


24 तासांत मुंबईत 7410 नवीन रुग्ण


आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी राज्याची राजधानी मुंबईत 7410  नवीन रुग्ण आढळले तर या काळात 75 रुग्णांचा मृत्यू झाला. (Coronavirus in Mumbai)  दरम्यान, या काळात जास्त लोक बरे झाले आणि 8090 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत 5 लाख 11 हजार 143 लोक बरे झाले असून  83 हजार 953 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात गुरुवारी रात्रीपासून लागू झालेल्या कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना कसा प्रवास करता येईल, याबाबतचे स्पष्टीकरण राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केले. राज्य शासनाच्या 13 एप्रिलच्या आदेशात अत्यावश्यक सेवेत अनेक सेवांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील सर्वांनाच मुंबईत उपनगरीय रेल्वेसेवेचा वापर करता येणार नाही. 


फक्त सरकारी कर्मचारी, आरोग्य सेवा, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विविध आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेसेवेचा लाभ घेता येईल. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही रेल्वे  प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नाही. रेल्वे किंवा खासगी वाहनाने प्रवास करण्यास मुभा असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्यात आले आहे.


काय आहेत निर्बंध ?


- बँकांमध्ये १५ टक्के किंवा पाच कर्मचाऱ्यांनाच परवानगी
- आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध, वैद्यकीय कारणासाठी प्रवासास मुभा
- सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यागतांना बंदी
-शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद, शिक्षक किंवा अन्य कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के उपस्थितीस परवानगी
-घरपोच सेवा रात्री 8 नंतरही सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर
- वकिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही, खासगी वाहनाने प्रवास करण्यास मुभा
- बाहेरगावच्या गाड्यांसाठी किंवा विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करण्यास परवानगी
- जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही,मात्र, प्रवासाचे योग्य कारण असणे गरजेचे