मुंबई दुबईच्या वाटेवर! 8500 कोटी रुपये खर्च करून BMC चं मेगाप्लॅनवर काम सुरु
Mumbai News : मुंबई... अनेकांसाठी स्वप्नांचं शहर. काहींसाठी हे शहर म्हणजे पोट भरण्याची जागा. तर, काहींसाठी हक्काचं ठिकाण. अशा या शहरात सध्या नेमकं काय सुरुये? पाहा
Mumbai News : मुंबईत दर दिवशी मोठ्या संख्येनं नागरिक येतात, कैक वर्षांपासून सुरु असणारं हे चक्र अद्यापही सुरुच आहे. यापैकी काहीजण मुंबई पाहण्यासाठी येतात, तर काहीजण या शहरात आपली नवी ओळख बनवण्यासाठी अर्थात नोकरीधंदा (Jobs in Mumbai) शोधण्यासाठी येतात. या शहरात येऊन इथंच स्थायिक झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. किंबहुना या आकड्यामध्ये दर दिवसागणिक भरही पडताना दिसत आहेत. परिणामी मायानगरी मुंबईची लोकसंख्या दिवसागणिकर वाढतेय हे नाकारता येत नाही.
शहराच्या गल्लीबोळात आता वस्त्या असून इथं गगनचुंबी इमारतींपासून लहानग्या घरांमध्ये राहणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच दृष्टीनं पालिकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रचंड लोकसंख्या आणि नागरिकांचा पाणीप्रश्न लक्षात घेता आता मुंबईत (Mumbai Water supply) पाणीपुरवठ्यामध्ये खंड पडू नये यासाठी मनोरीजवळ समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठीचा एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेलाही आता सुरुवात झाली आहे.
कसा आकारास येणार हा प्रकल्प?
पालिकेनं भविष्यातील गरजा लक्षात घेत आखलेला हा प्रकल्प येत्या 4 वर्षांमध्ये पूर्ण होऊन त्यात दर दिवशी 200 दशलक्ष लीटर खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते गोडं करण्यात येणार आहे. प्रकल्पनासाठी लागणारी यंत्र, त्यासाठीचं बांधकाम या साऱ्यासाठीच्या निविदा 4 जानेवारीपर्यंत भरता येणार आहेत. पालिकेच्या या प्रकल्पामुळं शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे.
मुंबईकरांसाठी पालिका करतेय कोट्यवधींचा खर्च
पालिकेकडून या महाप्रकल्पासाठी साधारण 8500 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. महागाईची टक्केवारी, जीएसटी आणि इतर करप्रणालीमुळं या प्रकल्पाच्या खर्चाच वाढ होत असल्याचं कळत आहे. दरम्यान, सुरुवातीला 200 दशलक्ष लीटर खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार असून, टप्प्याटप्प्यानं हे प्रमाण वाढवत नेऊन दर दिवशी साधारण 400 दशलक्ष लीटर खारं पाणी गोड्या पाण्यात रुपांतरीत करत ते शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
तिथं दुबईमध्ये (Dubai) फार आधीपासूनच अशा प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली असून, आता मुंबईसुद्धा त्याच मार्गावर जाताना दिसत असल्यामुळं जागतिक स्तरावरही अनेकांचच लक्ष शहरातील या योजनेकडे लागलं आहे.
हेसुद्धा वाचा : पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त; स्मारक उभारणीचा मार्ग अखेर मोकळा
मुंबईतील सध्याच्या पाणीपुरवठ्याकडे पाहायचं झाल्यास शहरात सध्या दर दिवशी 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. पण, पर्जन्यमान सरासरीहून कमी राहिल्यास मात्र शहरातील नागरिकांना पाणीकपातीला सामोरं जावं लागतं. येत्या काळात अशा समस्या सातत्यानं भेडसावत राहिल्यास मुंबईतील वाढत्या लोकसंख्येपुढं ही अडचण अधिक बळावून मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळं आता ही योजना पालिकेनं हाती घेतली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या 12 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.