Shivsena : शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचा अभिषेक हे पूत्र आहेत. अभिषेक घोसाळकर मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीबरोबर फेसबूक लाईव्ह करत होते. फेसबूक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं. गोळीबाराचा हा थरार फेसबूक लाईव्हमध्ये कैद झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळीबार करत आत्महत्या केल्याची माहिती आहे. पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांनी लोकांशी संवाद साधला. अभिषेक घोसाळकर लाईव्ह संवाद साधत असताना मॉरिस तिथून उटला आणि त्याने अभिषेक घोसाळकरवर सहा गोळ्या झाडल्या. अभिषेक घोसाळकर यांच्या पोटात गोळ्या लागल्या. 


फेसबूक लाईव्हमधून संवाद
फेसबूक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर मुंबई ते नाशिकआणि नाशिक ते मुंबई बसेस सोडण्याविषयी सांगत होते. तसंच सर्वांनी एकत्र काम करुयात असंही म्हणताना दिसातयत. आयसी कॉलनी, गणपत नगर, कांदळपाडा परिसरात चांगलं काम करायचं आहे. ही सुरुवात आहे, पुढे अजून काम करायचं आहे असंही अभिषेक घोसाळकर म्हणताना दिसतायत. आपलं भाषण संपवून ते तिथून उठले तितक्यात त्यांच्यावर मॉरीसने गोळीबार केला. 


अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक होते, आताच्या टर्ममध्ये त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या. त्यांचे वडील विनोद घोसाळकर हे माजी आमदार राहिले आहेत. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद आहे. 


आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
या घटनेवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अभिषेक घोसाळकर संध्याकाळी पाच वाजता मातोश्रीवर बैठकीसाठी आले होते. आमची बैठक झाली आणि त्यांच्यावर गोळीबार झाल्यची घटना घडली आहे. राज्यात गु्ंडाराज सुरु असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 


गणपती मिरवणूकीत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मिंदेंनी सिद्धविनायक न्यासाचा अध्यक्ष केलं आहे. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. या गद्दार आमदारांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही, येणार सरकार हे आमचं आहे अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली आहे.