इस्रायल-हमासमधील युद्धावर भाष्य करणाऱ्या मुंबईतील मुख्याध्यापिकेचे निलंबन, म्हणाल्या `राजकीय दबावाखाली...`
या प्रकरणावरुन परवीन शेख यांनी मी यावर कायदेशीर मार्गाने न्याय मागणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Principal Praveen Shaikh Fired Palestine issue : मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेने हमास आणि प्लॅस्टाईनच्या युद्धावर सोशल मीडियावर भाष्य केले होतं. यावरुन आता महाविद्यालयाने त्या मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची कारवाई केली आहे. परवीन शेख असे या निलंबित मुख्याध्यापिकेचे नाव आहे. या प्रकरणावरुन परवीन शेख यांनी मी यावर कायदेशीर मार्गाने न्याय मागणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोमय्या महाविद्यालयातील मुख्याध्यापिकेने परवीन शेख यांनी पॅलेस्टाईन आणि हमास यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणारी आणि त्यांच्या समर्थनार्थ आशय असलेल्या मजकुराला लाईक केले होते. त्यासोबतच शेख यांनी यावर आपली मते मांडली होती. पण यावरुन महाविद्यालयाने निलंबनाचा बडगा उचलला आहे.
परवीन शेख यांची भूमिका मूल्यांशी पूर्णपणे विसंगत
आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संपूर्णपणे समर्थन करतो. परंतु मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलेली भूमिका ही ‘सोमय्या व्यवस्थापन’ जपत असलेल्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे, असे स्पष्टीकरण सोमय्या महाविद्यालयाने दिले होते. त्यानंतर सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाने मंगळवारी परवीन शेख यांना नोकरीवरुन काढत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. आता परवीन शेख यांनी लिखित स्वरुपात यावर स्पष्टीकरण दिले आहे.
माझं निलंबन चुकीच्या पद्धतीने - परवीन शेख यांचा दावा
"मला व्यवस्थापनाने कामावरुन कमी करण्याची नोटीस न बजावता सोशल मीडियावर आणि माध्यमांवर निलंबनाच्या कारवाईबद्दल कळले. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. चुकीच्या माहितीमुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. माझं निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं आहे", असे परवीन शेख यांनी म्हटले आहे.
राजकीय दबावाखाली माझ्यावर कारवाई
"गेले 12 वर्ष मी या शाळेत काम करत आहे. पण माझ्या विरोधात केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगला माझी शाळा बळी पडली. त्यांनी माझी बाजू ऐकून न घेता राजकीय दबावाखाली माझ्यावर कारवाई केली. मी यासाठी कायदेशीर मार्गाने न्याय मागणार", असे परवीन शेख यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.