#MumbaiRainlive : मुंबईत पावसाचा जोर ओसरला
अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : साधारण गेल्या आठवडाभरापासून सुरु असणाऱ्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच जोर पकडला आहे. शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, कोकण परिसराला झोडपलं आहे. शनिवारी रात्रीपासूनही मुंबईसह उपनगरांत पावसाची संततधार असल्यामुळे सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान पावसाची सद्यस्थिती पाहता मध्य रेल्वेची वाहतून पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर, पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
*मुंबईत पावसाचा जोर ओसरला. साचलेलं पाणीही ओसरण्यास सुरुवात.
*रविवारीसुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
*दरम्यान, गरज असेल तरच घराबाहेर पडा असा सतर्कतेचा इशाराही देण्याच आला आहे.
*पावसाच्या माऱ्याचे थेट परिणाम हे मुंबापुरीतील जनजीवन आणि वाहतुक व्यवस्थेवर झाले आहेत.
*रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाले असून, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं. दरम्य़ान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
*उत्तर मुंबईतल्या मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे त्याचा फटका आता आजूबाजूच्या परिसराला देखील बसला.
*पवईच्या मोरारजी नगर भागातील आरेकडे जाणाऱ्या सबवे मध्ये पाणी भरल्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
*मीरारोडमधील अमिश पार्क सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरांत पाणी शिरलंय. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.