मुंबई: महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या मुंबईतील चित्रशाळांमध्ये मूर्ती तयार करण्याची लगबग सुरु आहे. काही सार्वजनिक गणेश मंडळांनी आपापल्या मूर्ती मंडपांमध्येही नेल्या आहेत. मात्र, या सगळ्यात लालबाग परिसरातील तेजुकाया सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती यंदा चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये इकोफ्रेंडली गणेशमूर्ती आणण्याचा कल वाढत आहे. परंतु, इकोफ्रेंडली मूर्तींच्या उंचीवर मर्यादा येत असल्याने सार्वजनिक मंडळांनी हा बाब अजूनही तितकीशी गांभीर्याने घेतलेली नाही. मात्र, तेजुकाया गणेश मंडळाच्या मूर्तीमुळे यंदा सर्वांसमोर नवा आदर्श प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. 


तेजुकाया मंडळाची ही इकोफ्रेंडली मूर्ती २२ फुटांची आहे. जुन्या वर्तमानपत्रांच्या कागदाचा लगदा वापरून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. यासाठी तेजुकाया मंडळाच्या सदस्यांनी गेल्यावर्षीपासूनच जुनी वर्तमानपत्रे गोळा करायला सुरुवात केली होती. यानंतर मे महिन्यापासून ही मुर्ती घडवायच्या कामाला प्रारंभ झाला. आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच तेजुकायाचा इकोफ्रेंडली बाप्पा सर्वांना पाहायला मिळेल. 


मात्र, इकोफ्रेंडली मूर्तीमुळे मंडळाच्या बजेटमध्ये यंदा वाढ करावी लागली आहे. एरवी दरवर्षी गणेश मूर्तीसाठी चार लाखांचा खर्च येतो. मात्र, यंदा इकोफ्रेंडली मूर्तीसाठी मंडळाला १२ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे १५ वर्षांपूर्वीही तेजुकाया मंडळासाठी अशीच मूर्ती तयार करण्यात आली होती. 


याशिवाय, मंडळाने यंदा प्रवेशद्वारावर नेहमीप्रमाणे सजावट न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी हे पैसे कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येतील. तसेच भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी येताना प्रसाद व फुले आणू नयेत. त्याऐवजी पेन्सिल आणि वह्या आणाव्यात. ही मदत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असे तेजुकाया मंडळाने सांगितले आहे.