मुंबई, ठाण्यासह उपनगरातील नियम शिथिल करण्यावर निर्णय कधी?
25 जिल्ह्यांतील निर्बंध तर शिथिल पण मुंबई-ठाण्यासह उपनगराचं काय?
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: राज्यातील 11 जिल्हे वगळता 25 जिल्ह्यांमध्ये नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामध्ये मुंबई आणि उपनगरात नेमके कोणते नियम असणार याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असू शकतो. कोरोना नियंत्रणात आला असला तरी मुंबई, मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याला कोणताच दिलासा देण्यात आलेला नाही. या तिन्ही जिल्ह्यांबाबतचा निर्णय हा स्थानिक प्रशासन घेणार आहे.
यानुसार या 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले. या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरचा समावेश नाही. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील निर्बंध केव्हा शिथिल होणार, असे प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केले गेले. मुंबई शहर आणि उपनगरातील निर्बंध शिथिल करण्याबाबत आज रात्री उशिरापर्यंत निर्णय येणार आहे. त्यामुळे मुंबईतील कोणते निर्बंध शिथिल होणार आणि कशातून सूट मिळणार, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये सध्यातरी तिसऱ्या टप्प्यातील नियमच लागू असणार असं दिसतं आहे. त्यानुसार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार की कायम राहणार, याबाबतचा मोठा निर्णय आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याआधी स्थानिक पातळीवरचा निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.
तिसऱ्या टप्प्यात मुंबईसह उपनगर असल्याने कोणते नियम सध्या आहेत?
सर्व दिवशी संध्याकाळी 5 नंतर नागरीकांना कामाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. सर्व प्रकारची दुकाने संध्याकाळी 4 पर्यंतच सुरू राहाणार. मॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स बंद रहाणार. हॉटेल आणि रेस्टॉरंट केवळ पार्सल सेवाच सुरु राहाणार. बगीचे आणि मैदाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 5 ने 9 सुरू राहाणार, परंतु विकेंडला ते बंद ठेवण्यात येतील. खासगी कार्यालये संध्याकाळी 4 पर्यंत खुले असणार आहेत.
लग्न समारंभाला केवळ 50 लोकांची मर्यादा कायम आहेत. अंत्यसंस्काराला केवळ 20 लोकांचीच परवानगी असणार आहे. या सगळ्या नियमात आता अजून कोणती सूट मिळणार की हे नियम मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये कायम राहणार याचा निर्णय आज रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत.