मुंबई : मुंबई ते ठाणे प्रवास आता सुसाट होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील (Eastern Expressway) छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन (Chhedanagar Junction) इथल्या उड्डाणपूलाचा (Flyover) तसंच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचा (Elevated Road) लोकार्पण सोहळा आज मुख्यमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते संपन्न झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नल फ्री
मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील 1.23 किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण करून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती  महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होणार असून नवी मुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसंच नवीमुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर इथल्या छेडा नगर जंक्शनवर मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत होती. 


ही वाहतूकोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी 223.85 कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतूकीसाठी  खुला करण्यात आला आहे. तसंच आज लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपूलासाठी 86.33 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.


पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी आणखी गतिमान
सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शन पर्यंत 3.03 किमी लांबीच्या उन्नत मार्गाचं लोकार्पण करून आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उन्नत मार्गाच्या दोन मर्गीकांचं तसंच एमटीएनएल आर्मचे लोकार्पण करण्यात आलं होतं. बीकेसी आणि कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्या द्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात केला जात आहे. 


त्यानुसार पहिल्या भगात 5.9 किमीचा उन्नत मार्ग असणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत बिकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. तसंच ते पुर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेत, त्यामुळे मुंबईचं व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात  होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. तसंच दोन्ही द्रुतगतीमहामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नल विरहित डबल डेक्कर उन्नतमार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास 45 मिनिटांची बचत होईल. 


मानखुर्द घाटकोपर लिंक रोड पूर्ण झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन इथं नवी मुंबई वरून येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत होती. तसंच ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या  प्रवाशांना सिग्नल वर बराच वेळ थांबावं लागत असे. नव्या उड्डाणपुलामुळे आता ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता विनाव्यत्यय आणि सिग्नल विरहित होणार आहे.