मुंबई विद्यापीठाकडून बीएफएम सत्र ६, लॉ सत्र १० परीक्षेचा निकाल जाहीर
Mumbai University Result: या परीक्षेचे निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Mumbai University Result: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या मे
२०२३ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीकॉम फिनान्सियल मार्केटस ( बीएफएम ) सत्र ६ व ५ वर्षीय विधी शाखेच्या सत्र १० या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
बीएफएम सत्र ६ च्या परीक्षेमध्ये एकूण ६५६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १३१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ३०० एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर १६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत २३४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीएफएम सत्र ६ चा निकाल ७३.७१ टक्के लागला आहे.
विधी शाखेच्या सत्र १० च्या परीक्षेमध्ये एकूण ८०६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १५६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ५४४ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर १४ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ५७४ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. लॉ सत्र १० चा निकाल ५८.४१ टक्के लागला आहे.
विधी शाखेच्या (३ वर्षीय ) सत्र ६ चे मूल्यांकन पूर्ण झाले असून निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.लवकरच हा निकालही जाहीर करण्यात येईल.
विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे ८३ निकाल जाहीर केले आहेत. आज ४ परीक्षांचे निकाल जाहीर केले. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.