Mumbai University : मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रातील ऑक्टोबर व नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये शैक्षणिक सत्रानुसार परीक्षा घेणे,त्याचे मूल्यांकन वेळेवर करून घेणे व निर्धारित वेळेत निकाल लावणे या व इतर विविध उपाययोजना केल्यामुळे  हिवाळी सत्राच्या पदवीच्या बीए, बीकॉम , बीएस्सी, बीफार्म, बीआर्च अशा 72 परीक्षेचे निकाल 30 दिवसाच्या आत जाहीर केले आहेत. उन्हाळी सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी बारकोड  व आसन क्रमांकांमध्ये चूक केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले यामुळे त्यांचा निकालही निर्धारित वेळेत जाहीर होऊ शकला नाही. यामुळे मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात अनेक उपाययोजना केल्या, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.


उत्तरपुस्तिकाचे मूल्यांकन पूर्ण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई विद्यापीठात उत्तरपुस्तिकाचे मूल्यांकनाचे काम संगणक आधारित प्रणालीच्या माध्यमातून ( On screen marking ) करण्यात येत असून आजपर्यंत झालेल्या  परीक्षेचे मूल्यांकनासाठी एकूण7 लाख 94 हजार 312 उत्तरपुस्तिका प्राप्त झाल्यापासून आजपर्यंत 6 लाख 78 हजार 184 तपासून झाल्या आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान या मोठ्या अभ्यासक्रमाचे मूल्यांकन वेळेत झाले आहे.


शिक्षकांचे सहकार्य 


महाविद्यालयातील शिक्षकांनीही सहकार्य करून उत्तरपुस्तिकेचे मूल्यांकन संगणक आधारित प्रणालीच्या माध्यमातून केले. 
आजपर्यंत झालेल्या परीक्षेच्या 68 हजार 657 शिक्षकांनी या उत्तरपुस्तिका 
वेळेत तपासल्या आहेत.


विद्याशाखा-          शिक्षक संख्या 


मानव्यशास्त्र शाखा  :       17 हजार 887
वाणिज्य व व्यवस्थापन शाखा : 26 हजार 630
विज्ञान व तंत्रज्ञान शाखा : 17 हजार 103
आंतरविद्या शाखा : 7 हजार 37


अचूकतेसाठी माहितीचे स्टिकर


मागील परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने या हिवाळी सत्रापासून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविली. ती फाईल परीक्षा केंद्राने डाऊनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली. यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळेल व या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत.


 ऑनलाईन उपस्थिती पद्धत
विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली. परीक्षा केंद्र विद्यार्थ्याची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन उपस्थिती प्रोग्राममध्ये नोंदवली गेली.यामुळे विद्यार्थी उपस्थित आहे का नाही ते तात्काळ विद्यापीठास समजले. तसेच यात कॉपी केसचीही नोंदणी करण्याची सुविधा आहे.


30 दिवसाच्या आत 72 निकाल जाहीर 


हिवाळी सत्रातील ऑक्टोबर व नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीफार्म, बीआर्च याबरोबरच आजपर्यंत 75 परीक्षापैकी 72 परीक्षांचे निकाल विद्यापीठाने निर्धारित वेळेत म्हणजे 30 दिवसाच्या आत जाहीर केले आहेत. तर 3 परीक्षांचे निकाल 45 दिवसात लागले आहेत. आजपर्यंत पदवी स्तरावरील 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आले आहेत. व उर्वरित परीक्षेचे निकालही निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येतील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. 


हिवाळी सत्राच्या परीक्षेची सांख्यकी


* हिवाळी सत्राच्या एकूण परीक्षा : 439
* प्राप्त उत्तरपुस्तिका : 7 लाख 94 हजार 312 
* तपासलेल्या उत्तरपुस्तिका : 6 लाख 78 हजार 184  
* तपासणी करणारे शिक्षक : 68 हजार 657 
* 30 दिवसाच्या आत जाहीर केलेले 
   निकाल : 72