नव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षकांना `असे` करणार तयार, मुंबई विद्यापीठाचा निर्णय
Mumbai University NEP Syllabus: अभ्यासमंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने विविध सहा व्हर्टिकल्स, त्यांचे मूल्यांकन आणि परीक्षा या अनुषंगाने सर्व संबंधित शिक्षकांना मार्दर्शन करून प्रशिक्षित केले जात आहे.
Mumbai University NEP Syllabus: मुंबई विद्यापीठामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सर्व विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तरावरील अभ्यासक्रमांची पूनर्रचना करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. या शैक्षणिक वर्षापासून बिगर स्वायत्त महाविद्यालयांत पदवी स्तरावरील तीन आणि चार वर्षाच्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. या बदलाच्या अनुषंगाने विषय शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध जिल्ह्यात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित अभ्यासमंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने विविध सहा व्हर्टिकल्स, त्यांचे मूल्यांकन आणि परीक्षा या अनुषंगाने सर्व संबंधित शिक्षकांना मार्दर्शन करून प्रशिक्षित केले जात आहे.
मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग-मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या (युजीसी- एमएमटीटीसी) संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या विविध परिक्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळांचे सुक्ष्म नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. साठे महाविद्यालयात विज्ञान विद्याशाखा, एम. एल. डहाणूकर महाविद्यालयात वाणिज्य विद्याशाखेसाठी प्रशिक्षण पार पडले. तर व्हि.एन. बेडेकर व्यवस्थापन संस्थेत वाणिज्य, जोशी बेडेकर महाविद्यालयात मानव्यविज्ञान विद्याशाखा, डीटीएसएस महाविद्यालयात मानव्यविज्ञान विद्याशाखेचे प्रशिक्षण पार पडले. या या कार्यशाळेला कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह, प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. किशोरी भगत, प्रा. सुचित्रा नाईक, प्राचार्य डॉ. मुरलीधर कुऱ्हाडे यांच्यासह विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, समन्वयक यांच्यामार्फत या कार्यशाळांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. परीक्षा व मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परिणाम आधारित शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे.
पुढील प्रशिक्षणाअंतर्गत 30 सप्टेंबरला एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय रत्नागिरी येथे वाणिज्य विद्याशाखा, गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मानव्यविज्ञान विद्याशाखा, 1 ऑक्टोबरला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विज्ञान विद्याखाशेसाठी आणि 3 ऑक्टोबरला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी येथे विज्ञान, मानव्यविज्ञान, आणि वाणिज्य विद्याशाखेअंतर्गत अभ्यास मंडळांमार्फत विषय शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले. या प्रशिक्षणा दरम्यान विविध विषयांच्या शिक्षकांना अभ्यासक्रमांशी निगडीत प्रश्न, शंकाचे निरसन केले जात असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या अभिप्रायाची अभ्यास मंडळांकडून नोंद घेतली जात असून विद्यापीठामार्फत पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीचे नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.