शेकडो उत्तरपत्रिका अस्ताव्यस्त, ऑनलाईनचा घोळ विद्यार्थ्यांना पडणार महाग
मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन पेपर तपासणीचे घोळ दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
मुंबई : मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन पेपर तपासणीचे घोळ दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.
विद्यापिठात झालेल्या सावळ्या गोंधळामुळे शेकडो उत्तरपत्रिका अस्ताव्यस्त झाल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. ऑनलाईन पेपर तपासणीचं कंत्राट दिलेल्या कंपनीला आता उत्तरपत्रिकाच सापडत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्याची वेळ विद्यापीठावर आलीय.
कॉमर्स रिझल्टही लटकलेलेच
तिकडे कॉमर्स शाखेच्या तब्बल ६०,००० उत्तर पत्रिकांची तपासणी नागपूर विद्यापीठातर्फे अजूनही झालेली नाही. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी उत्तर पत्रिका तपासणीचे काम नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयांमध्ये सुरु झाले होते आणि दोन लाख उत्तर पत्रिका तपासण्याची जवाबदारी नागपूर विद्यापीठाकडे होती. पण २० दिवसांत यापैंकी १ लाख ४० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी झाली असली तरीही ६०,००० पत्रिका तपासणे अजून शिल्लक आहे.
मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लवकर जाहीर व्हावे, या करता नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला होता आणि ठरल्याप्रमाणे उत्तरपत्रिका तपासणी नागपुरात सुरु झाली होती. पण अद्याप उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली नसल्याने मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडण्याची शक्यता व्यक्त होते आहे.