मुंबई पूर्ण अनलॉक करण्याबाबत लवकरच BMC मोठा निर्णय घेणार?
दोन आठवडे रुग्ण संख्येचा आढावा घेत मुंबई अनलॉक करण्याची शिफारस महापालिका टास्क फोर्सला करणार आहे.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतल्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने घसरत आहे. पुढचे दोन आठवडे रुग्णसंख्येत अशीच घट कायम राहिली तर फेब्रुवारीनंतर मुंबई १०० टक्के निर्बंधमुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दोन आठवडे रुग्ण संख्येचा आढावा घेत मुंबई अनलॉक करण्याची शिफारस महापालिका टास्क फोर्सला करणार आहे. डिसेंबरच्या शेवटी २१ हजारांवर आढळणारी रुग्णसंख्या सध्या ६०० वर आलीय. त्यामुळे मुंबई लवकरच निर्बंधमुक्त होण्याची शक्यता आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, थीम पार्क, स्विमिंग पूल ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत,ती १०० टक्के क्षमतेने सुरू होतील. सांस्कृतिक कार्यक्रम, भजने आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध आहे. जो हटवला जावू शकतो. लग्न समारंभागसाठी २०० जण उपस्थित राहण्यास परवानगी आहे. यावरील बंधनही हटवले जावू शकते.
राज्यात कोरोना रूग्ण कमी झाल्याने नाट्यगृह, चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू करा अशी मागणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे. तर आता शाळा देखील शनिवार रविवार सुरू कराव्यात असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.