मुंबई : मध्यमवर्गीय मुंबईकरांचे पोट भरणा चणाडाळीसोबत डाळीचे पीठ महागल्याने विक्रेत्यांनी वडापावच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. साध्या गाडीवर 12 रुपयांना मिळणारा वडापाव 15 रुपयांपर्यंत मिळणार आहे. वडापावसोबत भजीच्या प्लेटचे दरही वाढलेयत. भजी घेताना देखील तुम्हाला 4 ते 5 रुपये जास्त द्यावे लागतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील प्रसिद्ध जम्बो किंगमध्ये वडापावचे दर आता 18 रुपये प्रतिनग करण्यात आले आहे. तर बिकानेर स्वीट, ठक्कर स्वीट अशा मोठ्या व्यावसायिकांनी वडापाव चे दर 20 रुपये केले आहेत.


गेल्या सहा महिन्यांपासून चण्याच्या पिठाच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे सध्याच्या दरांत वडापाव विकणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे आमच्याकडे वडापावचा दर 12 रुपयांवरून 15 रुपये करण्यात आला आहे, असे प्रार्थना समाज मार्केटजवळील नामांकित शिववडा पावचे मालक अरुण गडदे यांनी सांगितले.


दादर स्थानकाजवळील जम्बो किंग या वडापावच्या शाखेत 15 रुपयांचा भजीपाव 18 रुपयांनी विकला जात आहे. वडापावची कायम मागणी असते, मात्र डाळीच्या किमती वाढल्यामुळे व्यवसाय करणे परवडत नसल्याचे या दुकानाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.



तेलाच्या दरात दिवाळीनंतर साधारणपणे तीस टक्के दरवाढ झाली आहे. तर बेसनाच्या दरात 15 टक्के दरवाढ झाली असल्याने खाद्यपदार्थांच्या दरात वाढ ही अटळ होती. परंतु या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात बसत असताना सरकारने या दरवाढीला अंकुश लावावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.