वाडिया रुग्णालयाचा अनोखा उपक्रम, मुलांच्या विकासासाठी थेरपी पार्क
वाडिया रुग्णालयाच्या आवारात थेरेपी पार्क सुरू करण्यात आलं आहे.
सुस्मिता भदाणे, मुंबई : आज देशभरात बालदिन साजरा केला जात आहे. मुंबईत बालदिनानिमित्त विशेष मुलांच्या विकासासाठी भारतातील पहिले थेरपी पार्क खुले झाले आहे. लहान मुलांवर उपचार करण्यासाठी वाडिया रुग्णालयाच्या आवारात थेरेपी पार्क सुरू करण्यात आलं आहे. या थेरेपी पार्कमध्ये सामान्य मुलांना खेळता खेळता खूप काही शिकायला मिळणार आहे. शिवाय दिव्यांग आणि ऑटिझम झालेल्या मुलांवरही या थेरेपी पार्कमध्ये उपचार होणार आहेत.
देशातलं हे पहिलं चिल्ड्रन्स थेरेपी पार्क आहे. लहान मुलांसाठी स्पर्श ओळखणे, रंग ओळखणे, अंक मोजणे-जमावे अशा खेळाचा समावेश करण्यात आला आहे. अनेकदा दिव्यांग किंवा ऑटिझमच्या मुलांना इतर सामान्य मुलांप्रमाणे खेळ खेळता येत नाहीत.
या गोष्टी लक्षात घेऊन पार्कमध्येच मुलांना लर्निंग थेरपी देण्यात येणार आहे. गरज असेल त्यांच्यावर उपचार आणि मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या दुहेरी हेतून उभारण्यात आलेलं हे पार्क म्हणजे लहान मुलांसाठी बालदिनाचं परफेक्ट गिफ्ट म्हणावं लागेल.