देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :(Mumbai News) मुंबईमध्ये सध्या पालिकेच्या वतीनं काही निवडक विभागांमध्ये पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सकाळच्या वेळी पाणीपुरवठा कमी दाबानं होणार असल्यामुळं हा निर्णय घेण्यात येईल. प्राथमिक माहितीनुसार एच पश्चिम आणि के पश्चिम विभागातील काही भागांमध्ये शुक्रवारी (1 डिसेंबर 2023 ) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीनंतर  दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर घेण्यात आलं असून त्यामुळं पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे. 


कुठे सुरुये पाणीगळती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मेट्रो प्रकल्पाचं ड्रिलिंग काम सुरु असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक 3 आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मुख्य जलवाहिनीला गुरुवारी इजा पोहोचून गळती सुरु झाली. ही बाब लक्षात येताच बृहन्मुंबई महानगरपालिकेने गळती दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर हाती घेतलं. पण, या कामामुळं एच पूर्व, एच पश्चिम व के पश्चिम विभागातील काही परिसरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 


प्रशासकीय यंत्रणांचं काय म्हणणं? 


प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या माहितनुसार वेरावली 3 जलाशयाच्या 1800 मीमी व्यासाच्या दोन इनलेट पैकी एक इनलेट मुख्य जलवाहिनीला (वॉटर मेन) अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक 3 आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ  गुरुवारी गळती सुरु झाली. ज्यानंतर जलवाहिनी दुरुस्तीचं काम त्वरित हाती घेण्यात आलं, असून ते युद्धपातळीवर सुरू आहे. 


हेसुद्धा वाचा : अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्रीबाबत दादांचे मोठे संकेत


परिणामस्वरुप एच पूर्व विभागातील सांताक्रुझ पूर्व (वाकोला, प्रभात कॉलनी ), एच पश्चिम विभागातील सांताक्रूझ पश्चिम, खार पश्चिम,  बांद्रा पश्चिम व के पश्चिम विभागातील अंधेरी पश्चिम (चार बंगला, जुहू कोळीवाडा, एस व्ही रोड इत्यादी) येथील  पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी यांची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे .