शहरातील रस्ते 2 वर्षात खड्डेमुक्त होणार, मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट
मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामं आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (23 जुलै) आढावा घेतला.
मुंबई : मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामं आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (23 जुलै) आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. (mumbai will be pothole free next 2 year bmc)
दरम्यान, मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात सर्व कामं पूर्ण होऊन मुंबई खड्डे मुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिकेच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यावेळी माहिती देताना व्यक्त केला.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुधारणा कामं आणि त्या अनुषंगाने केली जाणारी इतर कामे तसेच जोरदार पावसामुळे रस्त्यांवर होत असलेले खड्डे भरण्यासाठी केली जाणारी कार्यवाही यांचा एकत्रित आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई महानगरातील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी बैठकीत सादरीकरण केले. मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते बांधणी केली जात आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे 989.84 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो.
सन 2022-2023 मध्ये 236.58 लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित 423.51 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण देखील पुढच्याच वर्षी म्हणजे 2023-2024 मध्ये हाती घेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच पुढील 2 वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होईल, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले.