उद्धव यांनी मोदींच्या उपस्थित केले जाहीर, येणार ते युतीचेच सरकार!
`येणार ते युतीचेच सरकार येणार, करायचे ते दिलखुलासपणे करायचे`
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना किती गोष्टींसाठी पंतप्रधानांचं अभिनंदन करू असे म्हणत मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. येणार ते युतीचेच सरकार येणार, करायचे ते दिलखुलासपणे करायचे, आम्हाला सत्ता हवी आहे, ती राज्याचा विकास करण्यासाठी असे सांगत उद्धव ठाकरे यांनी युतीचा मुद्दा वदवून घेतला.
पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी
दरम्यान, आगामी पाच वर्षांत पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबईमध्ये मेट्रो भवन आणि मेट्रो ११ आणि १२ या दोन मार्गांचं भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत करताना पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख आपला लहान भाऊ असा केला. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोषही केला. आपल्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात उपस्थित असलेले नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं अभिनंदन करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केल्याचा आवर्जून उल्लेख केला.
सर्व प्रवासांसाठी एकच तिकीट
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये देशातलं सर्वात मोठं मेट्रो जाळं उभं राहात असल्याचं सांगितलं. २०२४-२५ पर्यंत हे सर्व मार्ग प्रवाशांसाठी खुले होतील आणि त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमुलाग्र बदल होईल असं ते म्हणाले. तसंच लोकल, मेट्रो, मोनो, बस आणि जलमार्ग या सर्व प्रवासांसाठी एकच तिकीट उपलब्ध करून देणारी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट योजनाही मुंबईतच सर्वात आधी सुरू होईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.