मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, उद्या ईडीच्या कार्यालयात शरद पवार जाणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केले आहे. माझा न्यायसंस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे मी सहकार्य करणार आहे, असे पवार म्हणालेत. दरम्यान, पवारांना कार्यालयात घेणार नाही, असे ईडीच्या सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे उद्या काय होणार याचीच उत्सुकता आहे. तर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाची नजर आहे. पवारांच्या ईडी भेटीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली. परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.  


शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहोत. त्यांचा पाहुणचार स्विकारणार असल्याचे म्हटले होते. तर ईडीकडून पवार यांना भेट देण्यात येणार नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.



पवार यांनी ट्विट केले आहे, काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे. तसेच कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.