मुंबईकरांना यंदाही पुराच्या पाण्यात डुंबावं लागणार?
मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. मुंबईत १७ ठिकाणी विकास कामं सुरू आहेत.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबण्याचा धोका आणखी वाढलाय. गेल्या वर्षी २९ ऑगस्टला मुंबईत सर्वाधिक पाऊस झाला होता... त्यावेळी मुंबईत पाणी तुंबलं होतं... यंदा मुंबईत मेट्रो रेल्वे आणि विविध विकासमांसाठी सुरू असलेल्या खोदकामांमुळे या तुंबणाऱ्या जागांच्या संख्येत वाढ होणार आहे. महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार मुंबईतल्या २२५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यापैंकी ६० ठिकाणे दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र, मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. मुंबईत १७ ठिकाणी विकास कामं सुरू आहेत.
कोणती आहेत ती ठिकाणं?
मुंबईत १७ ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. वांद्रे पूर्व, भायखळा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव पश्चिम, बोरीवली पश्चिम, सायन, किंग्ज सर्कल, कुर्ला, वांद्रे, माहिम, खार, दादर, माटुंगा या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता जास्त आहे.
पावसाचे पाणी उपसण्यासाठी २७९ पंप भाड्याने घेतले जातायत. यासाठी यंदा ५४ कोटींचा खर्च करण्यात येईल.
मुंबईत पाणी तुंबणा-या जागांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस विभाग यांची एक स्वतंत्र समिती नेमण्यात आलीय...ही समिती येत्या आठवड्यात मुंबईत पाणी तुंबणाऱ्या जागांचा पुन्हा आढावा घेईल.