मुंबई: बेफाम पडणाऱ्या पावसाला तोंड देण्यासाठी मुंबईची नागरी यंत्रणा सुसज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा सालाबादप्रमाणे यंदाही फोल ठरला. पावसाळ्याला अद्याप सुरूवात व्हायची आहे. मात्र, त्यापूर्वी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच सरीत नागरी यंत्रणेचे तीन तेरा वाजले. राजधानी मुंबईत विवीध ठिकाणी साधारण तासभर पडलेल्या पावसात नागरी यंत्रणेभोवती पाणी साचले. भांडूपमध्ये पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन लहानग्यांसह तिघांचे प्राण गेले. तर, मध्य आणि पश्चिम रेल्वेसेवाही कोलमडली. काही ठिकाणी रेल्वे उशीरा धावत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओम अप्पा फडतरे (वय १० वर्षे), झारा युनूस शेख (वय ९ वर्षे) आणि अनील यादव (वय ३२ वर्षे) अशी भांडूप येथे पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसून मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. या दुर्घटनेचा फटका इतर तिघांनाही बसला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. दुसरी घटना मालवणी येथे घडली. येथे दोन लहान मुले नाल्यात पडली. त्यातील एकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र, दुसऱ्या लहागन्याचा शोध रात्री उशीरपर्यंत सुरूच होता.


पाऊस फ्रंटवर रेल्वेसेवा बॅकफूटवर


आकाशात जमलेल्या ढगांनी बरसायला सुरूवात करताच मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. पण, रेल्वेलाही याचा चांगलाच फटका बसला. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरला होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होऊ लागल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. जलद आणि धिम्या मार्गावरील रेल्वे साधारण १० ते १५ मिनिटे उशीरांनी धावू लागल्या. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने आगोदरच गोंधळलेल्या मुंबईकरांच्या मनस्तापात चांगलीच भर पडली.


विमान सेवेवरही विस्कळतेचा शिडकाव


दरम्यान, पाऊस आणि बदलते वातावरण यामुळे ४० विमान सेवांच्या उड्डाणांना विलंब झाला तर, तीन विमाने नियोजीत मार्गाने न झेपावता इतर मार्गे वळविण्यात आली.