पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारची शाळा दप्तरांविना, पाठीवरचे ओझे कमी करुन इतर कलागुणांना वाव
विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळणार
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे (Covid19) मुंबईतील शाळा सध्या बंद आहेत. पण शाळा सुरु झाल्यावर पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी (BMC School Student) एक आनंदाची बातमी असणार आहे. कारण पालिकेच्या विद्यार्थ्यांचे आठवड्यातून एक दिवस पाठीवरचे ओझे कमी होणार आहे. यावेळेस विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आता शनिवारी दप्तरांविना भरणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून महिन्यातील दोन शनिवारी अभ्यासक्रमा व्यतिरीक्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि बुध्दीमत्तेला वाव देणारे उपक्रम राबविण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.
शिवसेनेचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी यासंदर्भात मागणी केली होती. या मागणीला प्रशासनाने अनुकूलता दर्शवलीय. यावेळी गायन, वादन, अभिनय, मुकाभिनय, संवादफेक, कथाकथन हे उपक्रम घेतले जातील. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस 'दप्तराविना शाळा' हा उपक्रम राबवला जातो.
त्याच धर्तीवर पालिकेच्या शाळेतही कोणत्याही दोन शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम सुरू करावा अशी मागणी दुर्गे यांनी केली होती. यामुळं महिन्यातील किमान दोन दिवस तरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होणाराय.