शिवसेना लोकप्रतिनिधींच्या झालेल्या हत्या आणि हल्ले!
शिवसेनेच्या नेत्यावर किंवा लोकप्रतिनिधींवर हल्ल्याची ही घटना पहिलीच नाहीये.
दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे कांदिवलीचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. शिवसेनेच्या नेत्यावर किंवा लोकप्रतिनिधींवर हल्ल्याची ही घटना पहिलीच नाहीये. याआधीही अनेकदा शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या हत्या आणि त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत शिवसेनेच्या कोणकोणत्या लोकप्रतिनिधींची हत्या आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला याचा हा आढावा.
१९९० च्या दशकापासून आजपर्यंत झालेल्या हत्या आणि हल्ले
- आमदार विठ्ठल चव्हाण यांची परळ येथील राहत्या घरी हत्या. जागेच्या वादातून गुरु साटम गँगनं केली होती हत्या.
- आमदार आणि भारतीय कामगार सेना सरचिटणीस रमेश मोरे यांची अंधेरी (पश्चिम) चार बंगला येथे राहत्या घराबाहेर हत्या. अरुण गवळी टोळीला देण्यात आली होती सुपारी.
- नगरसेवक खिमबहादूर थापा यांची भांडुपमध्ये हत्या. टोळीयुद्धातून हत्या.
- नगरसेवक केदारी रेडकर यांची चिंचपोकळी येथे हत्या. जागेच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती.
- परळ येथील नगरसेवक विनायक वाबळे यांची हत्या.
- नगरसेविका आणि अंडरवल्ड डॉन अश्विन नाईकची पत्नी नीता जेठवा-नाईकची घराबाहेर हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली होती.
- नगरसेविका अनिता बागवे यांच्या पतीची अंधेरी (पश्चिम) चार बंगला शाखे बाहेर हत्या करण्यात आली होती. जागेच्या वादातून ही हत्या झाली होती.
- नगरसेवक श्रीकांत सरमळकर यांच्यावर महापालिका मुख्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.
- माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्यावर दोन वेळा दाऊद टोळीने माहीम येथील राहात्या घराबाहेर केला होता प्राणघातक गोळीबार. हल्लेखोरांनी मशीनगनचा वापर केला होता. दोन्ही हल्ल्यात वैद्य गंभीर जखमी झाले होते पण सुदैवानं वाचले. पण त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना या हल्ल्यांमध्ये जीव गमवावा लागला होता.
- नगरसेवक आणि भारतीय कामगार चिटणीस जयवंत परब यांना खंडणीसाठी अरुण गवळी टोळीकडून धमक्यांचे फोन. परब यांनी केली होती पोलिसांत तक्रार. पुढे पोलिसांशी झालेल्या चकमकीत परब यांच्याकडे खंडणी मागणारे गुंड मारले गेले.
- जागेच्या वादातून नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची घाटकोपर असल्फा गाव येथील राहात्या घरात घुसून अरुण गवळी टोळीकडून हत्या.