प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार :  नालासोपाऱ्यात (Nalasopara Crime) हुंड्यासाठी (dowry) होणार्‍या छळामुळे एका नवविवाहित महिलेने कंटाळून गळफास घेऊन आत्मत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी तिने हाताच्या तळव्यावर हुंड्यासाठी छळ होत असल्याचे लिहून ठेवले होते. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी (Nalasopara Police) तिच्या पती आणि सासर्‍याला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या सातरस्ता येथे राहणार्‍या संगिता कनोजिया (22) या तरुणीचा मागील वर्षी जुलै 2022 मध्ये नालासोपाऱ्यात राहणार्‍या नितीशकुमार कनोजिया याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नात भरपूर हुंडा देऊनही तिचा अधिक रक्कमेसाठी छळ सुरू होता. तिचा पती, सासरे, सासू आणि नणंद तिचा हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ करत होते. तिला मारहाण देखील करण्यात येत होती. या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हुंड्यासाठी दररोज माझा छळा केला जात होता. अपमानित केले जात होते असे तिने हाताच्या तळव्यावर आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले आहे.


पती नितेशकुमार कनोजिया, सासरा शिवसेवक कनोजिया, सासू आशा कनोजिया आणि नणंद माला कनोजिया यांच्याविरोधात कलम 304(ब) 34 अन्वये नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी तिच्या पती आणि सासर्‍याला अटक केली आहे.


या प्रकरणी मयत संगिताचे वडील मुन्नीलाल कनोजिया यांनी सांगितले की, माझ्या मुलीला मारहाण केली जायची, तिला उपाशी ठेवलं जात होतं. मुलीच्या आत्महत्येनंतर मुन्नीलाल कनोजिया यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी मयत संगिताच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करुन तिचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.