नालासोपारा - १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभारात संतापाचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्याला जशाच तसे उत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकांत रेलरोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नालासोपारा रेल्वे स्थानकांत रेल्वे रुळावर उतरून रेलरोको केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. सकाळपासून बंद असलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक गेल्या पाच तासांपासून विस्कळित झाली आहे. या आंदोलनादरम्यान रस्तेही अडवण्यात आले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांवर पुतळेही जाळण्यात आले आहेत.  आंदोलनामुळे नालासोपारा, वसई, विरार भागातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात येणाऱ्या आंदोलनची कोणतीही पूर्वकल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. अशाप्रकारे करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे रस्ते वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकातील रूळावर उतरलेल्या आंदोलकांना बाहेर काढण्यात आले आहे. परंतु रस्ते वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. 


पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्येही व्यापारांकडून लाँग मार्च काढण्यात आला. कल्याणमध्ये सर्व दुकानेही बंद करण्यात आली आहेत. लालबागमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबईतील बेलापूर येथे औषधांची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.