मुंबई : राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. पण आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्हीही पक्ष एकत्रित निवडणुका लढणार की नाही अशा चर्चा सुरू आहे. त्यातच आता काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट  केलं आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे आदेश प्रदेश काँग्रेसेने दिले आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तडजोडी करण्याच्या पत्रात स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. 


आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. 
  
महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या पसंतीला उतरलं असून दोन वर्षाच्या कालावधीत झालेल्या विधान परिषद निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झालेली आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा, नव्या उत्साहाने व ताकदीने कामाला लागा असंही नाना पटोले यांनी सूचना केल्या आहेत.