दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. आता देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव अंतिम झाल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा (resign as Assembly Speaker) देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, इतर मंत्र्याची भेट घेऊन नाना पटोले आभार मानणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतरच विधानसभेत येऊन नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



आपल्याला पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, असं विधान नाना पटोले यांनी केलं होतं. एकीकडे राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं आहे. तसंच यापुढे महाविकास आघाडी राज्यातील बहुतांश निवडणुका एकत्र लढवेल अशी चर्चाही होते.


महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या नेत्यांनी तर अनेक वेळा हे सरकार २५ वर्ष टिकेल असा दावा केला आहे. असं असताना नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीत आणखी एका मुद्यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.


काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावं अशी विनंती दिल्लीतील नेत्यांना केली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याआधीच त्यांनी महाविकास आघाडीला छेद जाईल अशी भूमिका घेतली आहे.