iगोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता पॅड बांधून सज्ज झालेत. एका नव्या इनिंगसाठी. ही नवी इनिंग राजकारणाच्या पीचवर नाही तर क्रिकेटच्या पीचवर असणार आहे. कारण नाना पटोलेंची (Nana Patole) निवड माझगाव क्रिकेट क्लबचे (Mazgaon Cricket Club) प्रतिनिधी म्हणून झालीय. त्यामुळे नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीत मतदार झाले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार झाल्याने नाना पटोले आता अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझगाव क्रिकेट क्लब
नाना पटोले यांनीच नाही तर याआधी अनेक नेत्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधीत्व केलंय. यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनंतर आता माझगाव क्रिकेट क्लबची धुरा नाना पटोलेंच्या हाती सोपवण्यात आली आहे. याआधी मनोहर जोशी, शरद पवारसुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत


मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक 23 जुलै रोजी होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. त्यामुळे जर नाना पटोले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले तर यंदाची मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक रंगतदार होणार, यात काही शंकाच नाही. 


कोण मतदान करतं?
मुंबईत एकूण 329 क्रिकेट क्बल असून या क्लबचं प्रतिनिधित्व मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे आहे. या 329 क्लबचा प्रत्येकी एक सदस्य निवडणुकीत मतदन करतो. याशिवाय मुंबईतल्या राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या 40 खेळाडूंनाही मतदानाचा हक्क असतो. म्हणजे एकूण 369 मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार पॅनेलचे 11 सदस्य निवडून आले होते. 


या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पवार-शेलार गटाचे अमोल काळे आणि माजी क्रिकेटर संदीप पाटील यांच्यात लढत होती, अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 158 मतं पडली होती. त्यामुळे अमोल काळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. टी20 वर्ल्ड कप 2024 दरम्यान न्यूयॉर्कमध्ये अमोल काळे यांचं निधन झालं. त्यामुळे अध्यक्षपदाची जागा आता रिक्त आहे.