मोठी बातमी : `नाणार` आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे.
मुंबई : 'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश आज दिले. त्यामुळे नाणारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कार मुंबईतील 'आरे' बचावासाठी आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हेही मागे घेण्यात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्याचा धडाका लावला आहे. त्यांच्या या निर्णयाचे नाणार आणि आरे आंदोलकांनी स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरे मेट्रो आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर रत्नागिरीत केलेल्या नाणार प्रकल्प आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पुढे आली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी हे गुन्हे मागे घेतले आहेत.
दरम्यान, मार्च २०१८मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसे संघर्ष समितीला आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेतले नव्हते. त्यामुळे असंतोष होता. ऐन निवडणुकीत ठाकरे यांनी आमचे सरकार आले तर गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन त्यांनी पूर्ण करत आंदोलकांना दिसाला देण्याचे काम केले आहे.