मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. राणे हे मुख्यमंत्र्यांसोबत राणे मंत्रिपदाबाबत चर्चा करणार असल्याचं समजतंय.
त्यामुळं नारायण राणेंची मंत्रिपदी वर्णी लागणार का याबाबत आजच फैसला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप राणेंचा सरकारमध्ये समावेश करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
१ ऑक्टोबर रोजी नारायण राणे यांनी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. बहुजन, शेतकरी, कामगार आणि तळागाळातल्या समाजाची भूमिका आम्ही मांडू आणि त्यांच्यासाठी कार्य करू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे, तसेच देऊ तो शब्द पूर्ण करू असं आपलं ब्रीद वाक्य असणार आहे, असं देखील यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर नारायण राणे यांनी दिल्लीला जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. काँग्रेस सोडल्यावर राणे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा होत्या पण त्यांनी स्वत:चा पक्ष काढला.