मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.
मुंबई: सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बुधवारच्या मुंबई बंद आंदोलनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा क्रांती समन्वयक समितीने बंद मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर काहीवेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन प्रसिद्ध करून मोर्चेकऱ्यांशी चर्चेला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर मराठा संघटनेचे नेते विनोद पाटील यांनीही एक पाऊल पुढे येत मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यानंतर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग आला आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकसदस्यीय समितीचे अध्यक्ष असलेले नारायण राणे वर्षा बंगल्यावर आले आहेत. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाचा तिढा कसा सोडवायचा याविषयी चर्चा होईल. त्यामुळे लवकरच मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधिमंडळातील दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा समावेश आहे. या दोघांनीही विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत.