मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल: राणे
न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा कसा मांडायचा, यावर राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
मुंबई: मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असे विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. आरक्षणाच्या मागणीवरून सध्या राज्यभरात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकसदस्यीय समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीनंतर राणे यांनी म्हटले की, आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचा उद्रेक झाला असून हे आंदोलन चिघळू नये यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेवरून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असे वाटत असल्याचे राणेंनी सांगितले.
न्यायालयात सादर करायच्या प्रतिज्ञापत्रात नेमके कोणते मुद्दे अधोरेखित करावेत या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याचेही राणे म्हणाले.
मराठा आंदोलकांनीही लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, कुणीही आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, असे आवाहनही राणे यांनी केले.