AI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...
Navi Mumbai Crime : मुलाचा आवाज आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे क्लोन करुन वडिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुलाच्या वडिलांना आपण सीबीआय अधिकाऱ्या असल्याचे सांगत फसवणूक केली आहे.
Navi Mumbai Crime : गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सायबर गुन्हेगार नव्या नव्या पद्धतीने रोज लोकांची फसवणूक करतात. अशातच आता आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करुनही मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे. नवी मुंबईतही एआयचा वापर करुन एका व्यक्तीची धक्कादायकरित्या फसवणूक करण्यात आली आहे. एआयद्वारे वडिलांना मुलाचा आवाज ऐकवून एक लाख रुपये उकळल्याचे समोर आलं आहे.
नवी मुंबईच्या सीवूडमध्ये हा सगळा प्रकार घडला. केंद्रीय अन्वेषण विभागाने तुमच्या मुलाला पकडले असून त्याला अटक होऊ नये म्हणून वडिलांकडून पैसे उकळले आहेत. पीडित व्यक्ती ही सायन येथील एका कॉलेजमध्ये शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी कॉलेजमध्ये असताना एका आंतरराष्ट्रीय नंबरवरुन शिक्षकाला व्हॉट्सअॅप कॉल आला होता. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगितले.
तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्हात पकडले असून त्याच्यावरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे फोनवरुन बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यावेळी आरोपीने पीडित शिक्षकाला कोणतीही हालचाल न करु देता तात्काळ निर्णय घेण्यास भाग पाडले. खात्री पटावी यासाठी आरोपीने शिक्षकाचे मुलासोबतही बोलणं करुन दिलं. मुलाचे बोलणं ऐकून घाबरलेल्या वडिलांनी अटक टाळण्यासाठी आरोपीच्या सांगण्यावरुन विविध खात्यांमध्ये तब्बल एक लाख रुपये पाठवले.
त्यानंतर पीडित शिक्षकाने पुन्हा मुलाला फोन लावला. मात्र त्यावेळी बोलणे झाले असता मुलगा घरीच असल्याचे कळलं. हा सगळा प्रकार पाहून शिक्षकाला जबर धक्का बसला. वडिलांनी मुलाला हा सगळा प्रकार सांगितला असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आलं. त्यानंतर सायबर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.
मुलाचा आवाज कसा चोरला?
संबधित मुलाचा आवाज वडिलांना ऐकवण्यासाठी अगोदर बाप लेकाचे फोनवरील बोलणं रेकॉर्ड करण्यात आलं होतं का प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे असे आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर होतोय का असाही प्रश्न विचारला जात आहे.