पैसे देण्यावरुन नेहमीची कटकट... पतीला संपवण्यासाठी पत्नीने मामाला दिली सुपारी
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना पंजाब येथून अटक केली असून हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईच्या (Navi Mumbai crime) कळंबोली भागात पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कळंबोली सेक्टर चारमधील सिडकोच्या गार्डनमध्ये दहा दिवसांपूर्वी पहाटे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपालसिंग निषत्तरसिंग खोसा उर्प पालसिंग (48) यांचा मृतदेह आढळून आला होता. मात्र आता या हत्येचा छडा लावण्यात कळंबोली पोलिसांना (Navi Mumbai Police) यश आले आहे. जसपाल सिंगची त्याच्याच पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी मृत जसपालसिंगची पत्नी आणि तिचे दोन नातेवाईक अशा तिघांना अटक केली आहे.
मृत जसपाल सिंग खोसा उर्फ पालसिंग हा कळंबोली सेक्टर-4 मधील साईनगर सोसायटीत त्याच्या कुटुंबासह राहत होता. गेल्या सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जसपालसिंग हा आपल्या पाळीव कुत्र्याला गार्डनमध्ये फिरवण्याठी कळंबोली सेक्टर-6 मधील सिडको गार्डनमध्ये गेला होता. या दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी जसपालसिंग यांच्या छातीवर, मानेवर व डोक्यावर धारधार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. या हल्ल्यात जसपाल यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळंबोली पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयीत व्यक्तींबाबत माहिती मिळवली. या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पदरित्या आढळून आलेले व्यक्ती हे मृत जसपाल सिंग यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी जसपालसिंग याची पत्नी दलजित खोसा (38) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, दलजितने हत्येची कबुली दिली. पती जसपालसिंग हा तिला पैशांसाठी वारंवार त्रास देत होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून पतीचा काटा काढण्याचा कट रचला असे दलजितने सांगितले. यासाठी पंजाब येथील चुलतमामा जस्सी उर्प जग्गा व त्याचा मित्र या दोघांची मदत घेतल्याचेही दलजितने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दलजित खोसा हिला अटक करुन पंजाब येथून जस्सी उर्प जग्गा व त्याचा मित्र अशा दोघांना अटक केली आहे.
असा रचला हत्येचा कट
मृत जसपाल सिंग याची पत्नी दलजित खोसा ही 15 दिवसांपूर्वी पंजाब येथे गेली होती. त्याठिकाणी तिने चुलत मामा जस्सी उर्प जग्गा याची भेट घेऊन पती जसपालसिंग याचा काटा काढण्याचा कट रचला होता. त्यानुसार जस्सी उर्प जग्गा हा त्याच्या एका मित्रासोबत हत्येच्या चार दिवसापूर्वी नवी मुंबईत आला होता. त्यावेळी दलजित खोसा हिने त्या दोघांना आपल्या घरी न ठेवता, त्यांची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली होती. 8 मे रोजी सकाळी जसपालसिंग हा आपल्या पाळीव कुत्र्याला सिडकोच्या गार्डनमध्ये फिरवण्यासाठी घेऊन गेल्यानंतर त्याची माहिती दलजितने जग्गीला दिली होती. त्यानंतर त्या दोघांनी गार्डनमध्ये जाऊन जसपालसिंग याच्यावर धारधार शस्राने 14 वार करुन त्याची हत्या केली. त्यानंतर दोघेही रेल्वेने पंजाब येथे पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कशामुळे झाली हत्या
जसपाल सिंग याची पत्नी दलजित खोसा यांच्यात पैशावरुन सातत्याने वाद होत होता. दलजितचे वागणे व इतर कारणांनी जसपाल यांनी तिला पैसे देण्याचे थांबवले होते. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद सुरु होता. शेवटी दलजितने जसपालचा काटा काढण्याचे ठरवले आणि चुलतमामाला हत्येची सुपारी दिली. पतीची हत्या केल्यास २० लाख रुपये व पतीच्याच ट्रान्सपोर्ट व्यवसायात नोकरी देखील देण्याचे आश्वासन दलजितने आरोपींना दिले होते.