देवेंद्र फडणवीसांची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करा; नवाब मलिकांची मागणी
आरोप करताना त्यांनी एक फोटोही पोस्ट केला.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर असणाऱ्या नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना त्यांनी एक फोटोही पोस्ट केला. या सर्व प्रकरणामध्ये आता अमृता फडणवीस यांचंही नाव समोर आलं आहे.
मलिकांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये अमृता फडणवीस एका व्यक्तीसोबत दिसत आहेत. ही व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचं म्हणत त्यांनी भाजपकडून अशा व्यक्तींना संरक्षण दिलं जात असल्याचाही आरोप केला आहे. सोबतच या सर्व प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमघ्ये जयदीप चंदूलाल राणा नावाचा ड्रग्ज पेडलर दिसत आहे. ज्याच्यावर जून 2021 मध्ये एनसीबीनं अटकेची कारवाई केली होती. सद्यस्थितीला तो कारावासात आहे. पण, त्याचा फडणवीस यांच्या पत्नीसोबतचा पोस्ट करत मलिक यांनी बऱ्याच प्रश्नांना वाव दिल्याचं पाहायला मिळत आहे.
एका पत्रकार परिषदेमध्ये मलिक यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत फडणवीसांकडे आपला मोर्चा वळवला.
क्रांती रेडकरवरही मलिकांचा निशाणा
समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच याचिका दाखल करत मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्याचं मत मांडलं आहे. वानखेडे यांना आता आपल्य़ावर अटकेची कारवाई होण्याची भीती असल्याचं म्हणत त्यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्यावरही निशाणा साधला. मराठी अस्मितेची चादर ओढून तुम्ही कितीही कुटुंबाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तरीही यात यश मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तुमचा पती राज्याच्या विरोधात कटकारस्थानं रचत असल्याचं वक्तव्य त्यांनी क्रांती रेडकरला उद्देशून केलं. निरपराधांना वानखेडे कारागृहात टाकत आहेत, वसूलीचे रॅकेट चालवत आहेत अशा परिस्थितीत तुम्हाला वाटूच कसं शकतं की महाराष्ट्र सरकार तुमची मदत करेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.