Nawab Malik ED Remand : मनी लॉन्ड्रींग (money laundering) प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधले अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सेशन कोर्टाने ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप मविआमधल्या नेत्यांनी केला आहे. यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra FAdanvis) यांनी प्रतिक्रिया देत नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
हा संपूर्ण प्रकार अंत्यत गंभीर आहे. एनआयए (NIA) आणि ईडीने काही ऑपरेशनस केले. यात त्यांना मोठी लिंक मिळाली, की कशा प्रकारे दाऊद (Dawood Ibrahim) रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय, आणि कशा प्रकारे हे रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून होतायत, यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने  (ED) सर्च केला. हे सर्व ईडीने कोर्टात सांगितलं आहे. यातून अनेक लिंक्स बाहेर आल्या आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


यातीलच एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. मंत्री नवाब मलिक यांनी जी काही जमीन घेतली आहे. ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा राईट हँड आहे. आणि ज्याला हसीना पारकर (Haseena Parkar) दाऊदच्या प्रॉपर्टी  बिझमेसमध्ये फ्रंट मॅन वापरत होती. त्यांच्याकडून ही जमीन त्यांनी घेतली.


जमीनीचे जे मालक आहेत, त्या मालकांनी सांगितलं, की आम्हाला एकही पैसा मिळालेला नाही, आमच्यावर दबाव टाकण्यात आला. आम्हाला सांगण्यात आलं की जमीनीवरचं अतिक्रमण काढून टाकण्यासाठी आम्हाला पॉवर ऑफ अॅटरनी द्या, आणि म्हणून आम्ही दिली, पण ती संपूर्ण बदलून हा व्यवहार करण्यात आला, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.


25 लाख दिल्याचं दाखवण्यात आलं आहे, पण यातला एकही पैसा जमीन मालकांना मिळालेला नाही.  ज्या ठिकाणी हे सौदे झाले आणि जिथे हसीना पारकर येत होती आणि सौदे करत होती, तिथल्या लोकांनी यासंदर्भातील जबाब दिलेला आहे.


हा जो व्यवहार झाला आणि 55 लाख रुपये हसीना पारकरला देण्यात आले, त्याचे देखील पुरावे ईडीला मिळाल्याचं ईडीने सांगितलं आहे. एकूणच या व्यवहरात ही संपूर्ण जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिक यांना मिळाली. आणि त्याचवेळी हे सर्व पैसे अंडरवर्ल्डला गेले, यातला मनी लॉन्ड्रींगचा जो प्रकार आहे हा सगळा कॅशमध्ये व्यवहार करुन हजारो कोटींची जमीन घेण्यात आली,  हे पैसे हसीना पारकरला म्हणजे दाऊदला मिळाले, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


एखाद्या मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन घेण्याचं कारण काय, हसीना पारकरकडून जमीन घेण्याचं कारण काय, एकीकडे या व्यवहारानंतर मुंबईत तीनवेळा बॉम्बस्फोट झाले. जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना आपल्या व्यवहारातून पैसे देणार असू तर हे अतीशय निंदनीय आहे, म्हणून आज ईडीने कारवाई केली आहे. 


ईडीने मूळलोकांचे जबाब नोंदवले आहेत, ही सर्व कारवाई ईडीची नियमानुसार आहे. यातला टेरर फंडिंगचा अँगल स्पष्ट दिसत आहे. दाऊद हा जो या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे,  तो किंवा त्याच्या बहिणीशी व्यवहार कसा केला जाऊ शकतो, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.


या संपूर्ण प्रकरणात राजकारण न करता अशा प्रकारे जर टेरर फंडिंग होत असेल आणि तो पैसा दाऊद आणि हसीना पारकरला जात असेल तर याचा निषेध केला पाहिजे, सर्वांनी एकत्र येत भूमिका मांडली पाहिजे असं माझं मत आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.