नवाव मलिक यांचा आणखी एक `वार`, समीर वानखेडेंच्या नावावर `बार`
नवाब मलिक यांनी केलेल्या नवा आरोपांनी समीर वानखेडे आणखीनच गोत्यात आले आहेत
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. आज मलिक यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे.
समीर वानखेडेंच्या नावावर बार
नवी मुंबईतील सद्गुरू बार आणि रेस्टॉरंट समीर वानखेडे यांच्या मालकीचा आहे, असा नवा सनसनाटी आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिकांनी केला आहे. नवी मुंबईतील सद्गुरु रेस्टो बारचा फोटोच त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
बारवरून मलिकांचा वार
18 वर्षांखालील असतानाच समीर वानखेडे यांना दारूचं परमिट घेतलं. 2017 पर्यंत केंद्र सरकारकडे सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलात या परमीट बारची माहिती दिलेली नव्हती. त्यानंतर बारबाबत खोटी माहिती दिली. नियमानुसार केंद्रीय सेवेतील अधिकारी दारुचा किंवा अन्य कुठलाही व्यवसाय करू शकतो का? असा सवाल उपस्थित करत याबाबत केंद्रीय एजन्सीकडे तक्रार करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपले वडील ज्ञानदेव वानखेडे हे या बार आणि रेस्टॉरंटचे मालक असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे बारचालक दिनेश शेट्टी यांनी मात्र समीर वानखेडे हेच मालक असल्याचं मान्य केलं आहे. कधी कधी पूजेला ते कुटुंबीयांसोबत येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
समीर वानखेडेंनी खोटे जात प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला होता. वानखेडेंच्या शाळा दाखल्यावर ते मुस्लीम असल्याची नोंद असल्याचा दावाही मलिकांनी केला. आता थेट त्यांचं बार कनेक्शन उघड करून मलिकांनी वानखेडेंची पुरती कोंडी करून टाकली आहे.