मुंबई: महाविकाआघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये ताळमेळ नाही, या फडणवीसांनी केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांना सध्या कोणतेही काम नाही. मला त्यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. ताळमेळ नसल्यामुळे सरकार फारकाळ टिकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, असेच थोडे थोडे दिवस करून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाराज आमदारांची समजूत काढताना महाविकासआघाडीच्या नेत्यांची दमछाक


तसेच खातेवाटप आज किंवा उद्या जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. हे स्वाभाविक आहे. मंत्रिपदांची संख्या मर्यादित असल्यामुळे असे होणारच. परंतु, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपापल्या पक्षातील नाराजांची समजूत काढण्यात यशस्वी ठरतील, असा विश्वासही यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.



यावेळी जयंत पाटील यांनी वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) राज्याच्या घटलेल्या  उत्पन्नासंदर्भातही भाष्य केले. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटी आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी जीएसटी आयुक्तांनी वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून राज्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचे सविस्तर चित्र मांडले. त्यानुसार जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न घटल्याची माहिती समोर आली. याची नुकसानभरपाई केंद्र सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, ही नुकसानभरपाई मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे थोडेफार चिंतेचे वातावरण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.