मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC) मुद्द्यावरून भाजपवर शेलक्या शब्दांत टीका केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडीत जितेंद्र आव्हाड यांची सभा झाली होती. यावेळी आव्हाड यांनी CAA आणि NRCच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी एक हिंदी चारोळी म्हटली. दिल्लीश्वरांनो आज तुम्ही माझ्याकडे देशाचा नागरिक असल्याचा पुरावा मागत आहात. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, ज्यावेळी तुमचा बाप मान झुकवून इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा माझा बाप फास गळ्यात अडकवून इन्कलाब जिंदाबादचे नारे देत होता. आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NRC लागू झाल्यास देशातील पारधी समाजासमोर मोठे आव्हान निर्माण होईल. त्यांच्याकडे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे नाहीत. हा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या समतेच्या तत्वाला छेद देणार आहे. त्यामुळे लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध गोळवळकर अशी आहे. त्यामुळे केंद्र सरकार CAA आणि NRC कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करतच राहणार, असे आव्हाड यांनी सांगितले. 


काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी NRC च्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली होती. आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) फज्जा उडाल्यामुळे मोदी सरकारने आपला गिअर बदलला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राष्ट्रीय लोकसंख्या सूचीचा (NPR) विषय पुढे आणू पाहत आहे. NPR हे दुसरे-तिसरे काहीही नसून छुप्या मार्गाने NRC लागू करण्याचा प्रयत्न आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले होते.